राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु झाला. या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हे सर्व घडत असताना आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सीमावादाने निर्माण झालेल्या प्रश्नांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे जाते. असा आरोप पडळकर यांनी केला आहे.
जतमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात बोलत असताना पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या सीमावादाने निर्माण झालेल्या प्रश्नांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे जाते. कारण सीमाभागातील लगतच्या तालुक्यामध्ये विकास करण्याच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कमी पडले. सीमाभागातील विकासाच्या मुद्यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, आज सीमाभागात वादळ उठलेलं आहे ते वादळ परत कधी उठणार नाही याची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेणार आहोत अडीच वर्षांपूर्वी विश्वासघाताने महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आणि जिल्ह्यातील नेतृत्वकडे राज्याच्या कॅबिनेटमध्ये महत्वाच्या पदावर असताना सुद्धा जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो, याकडे देखील पडळकर यांनी लक्ष वेधले. जलसंपदा मंत्रिपद असूनही जयंत पाटील जत तालुक्यातील सीमावर्ती भागात पाणी देऊ शकले नसल्याचा आरोप पडळकर यांनी केला.