कोल्हापूर: राज्यात राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरून जुंपलेली असताना त्यातच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैयांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओसमोर आला. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले. या व्हिडिओवरून विरोधकांनी भाजप आणि सोमैयांवर चांगलाच निशाणा साधला होता. दरम्यान आता याच व्हिडिओवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्याठिकाणी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “जो प्रकार झाला तो चुकीचा झालाच आहे. किरीट सोमय्याप्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील.” अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमैयांच्या व्हिडिओबाबत दिली आहे.
पुढे बोलताना त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाऱ्यावर देखील भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये जे काही घडले आहे त्याचा मी निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलं आहे. पण विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. सरकार संसदेमध्ये चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे सरले. कारण राहुल गांधी हे संसदेत नाहीत त्यामुळे याच राजकारण केलं जातंय. विरोधक मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत.” असा सवाल करत त्यांनी प्रतिक्रिया दिली.