बीड : ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. अशातच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची थेट तारीखच सांगितली आहे. महाराष्ट्रातील असंवैधानिक सरकार येत्या 14 तारखेला कोसळणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
येत्या 14 तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. मात्र, दोनवेळा बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार यशस्वी झाले असून 14 फेब्रुवारीच्या निर्णयानंतर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास 184 आमदार या सरकारमध्ये राहतील, असे दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. अप्रत्यक्षपणे त्यांनी आणखी 20 आमदार राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे. ते 20 आमदार कोण याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तसेच, पंकजा मुंडे यांच्या विरोधात विरोधकांनी षडयंत्र रचून त्यांना बदनाम करण्यासाठी एक टीम बीडमध्ये तयार केली असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये असंतोष आहे. आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारही मिळणार नसून आपसात पायखेच होणार असल्याची टीका बावनकुळेंनी केली.