पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असेलली राजकीय रणधुमाळीमुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी आज कसबा गणपती मंदिरासमोर उपोषण केले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रविंद्र धंगेकर यांनी उपोषण मागे घेतले आहे.
भारतीय जनता पक्षाने प्रचारादरम्यान पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी धंगेकर पत्नीसमवेत हे आज सकाळी १० वाजता कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले. या निवडणुकीत लोकशाहीची हत्या झाली आहे, त्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याची, भूमिका धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
दरम्यान, कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळं भाजपचे धाबे दणाणले आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळं धंगेकरांच्या प्रत्येक हालचालीवर भाजपच्या कार्यकर्ते आणि नेते मंडळींकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळं कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. शिवाय त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळं कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळत आहे.