मुंबई : उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी मीडियांशी संवाद साधला. बाळासाहेब हेच माझं दैवत आणि शिवसेना हे दोन शब्द सोडून माझ्या समोर दुसरं काही आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची वेगवान पद्धतीमुळे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे भूषण देसाईंनी सांगितले.
बाळासाहेब हेच माझं दैवत आणि शिवसेना हे दोन शब्द सोडून माझ्या समोर दुसरं काही आलेलं नाही. एकनाथ शिंदे यांना मी जवळून पाहिलं आहे. त्यांची काम करण्याची वेगवान पद्धत, त्यांचं सुरू असलेलं काम यामुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही चौकशीमुळे शिंदे गटात सामील झालेलो नाही. त्यांच्या कामाची पद्धत आवडली म्हणून शिंदे यांच्याकडे आलो, असे भूषण देसाईंनी म्हंटले आहे.
तर, सुभाष देसाई पाच दशकं काम करत आहेत. परंतु, माझे विचार वेगळे असू शकतात. शिंदे सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. महिनाभर आधीच स्पष्ट चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरेंना आम्ही छोटेच वाटणार. मला ही वॉशिंग मशिन वाटत नाही. शिंदेंच्या कामामुळे आलो आहे, असे उत्तर भूषण देसाईंनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले, विधानभवनात कार्यक्रम सुरू आहे. तसा आपल्याकडे कार्यक्रम सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही 40 जण निघालो. रामदास कदम असतील इतर नेते असतील त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करून आलेत. आमच्याकडे आले तर वॉशिंग मशीन आणि त्यांच्याकडे पक्षप्रवेश होतो तेव्हा काय होतं. दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोटं स्वतःकडे असतात हे विसरू नका, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.