राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे सत्तांतरापासून मविआच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. त्यातच तपास यंत्रणांच्या माध्यमातून होणारी कारवाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्दयांवर राज्यसरकारला घेरण्यासाठी मविआने चांगलीच तयारी केली आहे. त्याआधी उद्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्रित सभा होणार आहे. याच सभेवर आता रोहयो तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले भूमरे?
उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची `वज्रमुठ`, संयुक्त सभा होत आहे. त्याच दिवशी दुसरीकडे भाजप व शिंदे गटाकडून शहरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना पालकमंत्री भुमरे म्हणाले की, ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार मांडले, त्याच मैदानातील सभेतून उद्या उद्धव ठाकरे त्या विचारांना तिलांजली देणार आहेत. एकट्याच्या जीवावर मैदान भरू शकत नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांना काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागले. अशी खरमरीत टीका भुमरे यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, विकासाच्या मुद्यावर या सभेत काहीच बोलले जाणार नाही, अडीच वर्षाच्या सत्तेत यांना काही करता आले नाही, त्यामुळे आता फक्त टीका करण्यासाठी या तीन पक्षांची ही सभा होणार आहे. टीका करणे हा एकमेव त्यांचा अजेंडा आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीची एकत्रित सभा घ्यावी लागत आहे. असे असले तरी ही सभा यशस्वी होवू शकणार नाही. कारण विरोधकांकडे टीकेशिवाय कुठलेच विकासाचे मुद्दे लोकांना सांगण्यासाठी नाहीत. असा टोला देखील भुमरे यांनी लगावला.