मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खेडमध्ये सभा घेत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी तुम्ही शिवसेना एनसीपी, काँग्रेसकडे गहाण ठेवली. गद्दारी आम्ही नाही केली. गद्दारी तुम्ही केली, अशी टीका शिंदे यांनी केली. याला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कालची जी सभा झाली ती ढ विद्यार्थ्यांची सभा झाली, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
कालची जी सभा झाली ती ढ विद्यार्थ्यांची सभा झाली. उद्धव ठाकरेंची सभा ही पाच मार्चला झाली. त्याच मैदानावर झाली आणि म्हणून आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी जवळ-जवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली. परंतु, तरीदेखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
फार अशी शिवराळ भाषा सभेमध्ये चालत नाही. असं कोणाबद्दल टीकाटिप्पणी करून खालच्या स्तरावर बोललेलं आवडत नाही आणि काल आपण बघितला असेल की रामदास कदम यांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून जी माणसे उठायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होऊन संपत आलं ती माणसं उठून निघतच होती, थांबायला तयार नव्हती, असेही त्यांनी म्हंटले आहे.
रामदास कदम तात्या विंचू म्हणायचो. तात्या विंचू कसा आहे, कारण गेले आठ महिने ज्या मुलाखती रामदास कदम देत आहेत. जे बोलतायेत त्याच्या व्यतिरिक्त रामदास कदम कडून एकही नवा मुद्दा नाही. मला कसं संपवलं माझ्या मुलाला कसं संपवलं. मी विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री झालो असतो म्हणून मला उद्धव ठाकरेंनी संपवलं वगैरे. त्यामुळे रामदास कदम यांना आता नवीन उपमा देण्याची गरज आहे. रामदास कदम म्हणजे आमच्या कोकणातला जोकर आहे, अशी जोरदार टीका जाधवांनी केली आहे.
दरम्यान, रामदास कदम यांनी सभेमध्ये भास्कर जाधवांवर हल्लाबोल केला होता. भास्कर जाधवांची काय औकात होती मला पाडायची. असे १०० भास्कर जाधव मी खिशात घेऊन फिरतो, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.