निसार शेख| चिपळूण: ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि राणे पिता-पुत्रामध्ये वाद सुरु असताना अशातच भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. भाजप आणि ठाकरे गट असा वाद आणखीच तीव्र झाला. आता हल्ल्यानंतर पहिल्यांदा भास्कर जाधव हे चिपळूणमध्ये आले. त्यावेळी जाधवांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
काय म्हणाले जाधव?
मला कधी कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास मी माझ्या मनाने निर्णय घेतो. सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. यामुळे माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला. मी बाळासाहेबांची शिवसेना पाहिलेली आहे, शिवसेनेवर आघात होत होता तेव्हा मला यातना होत आहेत. शिवसेना संपवण्याचा अनेकदा भाजपने प्रयत्न केला. पण, शिवसेना संपली नाही, त्यांनी आमचे 40 लोके फोडले. शिवसैनिकांना पुन्हा साद घालण्याचा मी निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पहिल्यासारखी गरजायला लागली आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी घेतलेली भूमिका माझ्या सहकाऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. गेले 40 वर्ष मी राजकारणात आहे. ज्या ज्या वेळी माझ्यावर आघात होतो. त्यावेळी माझ्यासोबत शिवसैनिक असतात. मला कधी गर्दी गोळा करावी लागत नाही, कधीच माझ्या सहकाऱ्यांना सूचना करावी लागत नाही. सर्व सहकारी माझ्या पाठिशी उभे राहतात. भावुक होऊन भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.