काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राज्यात दाखल झाली आहे. राज्यात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत राज्यातील काँग्रेसच्या मित्र पक्षांनी देखील सहभाग घेतला. या सभेत शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली होती. मात्र, राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राणे?
राहुल गांधींनी केलेल्या सावरकरांबद्दल विधानानंतर राजकारणात गदारोळ सुरु असताना त्यावरूनच आदित्य ठाकरे यांच्या सहभागावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, आदित्य ठाकरेंवर मी कधी काही बोलत नाही. तो बोलतो तेव्हा त्याची दाखल घेत नाही. आदित्य ठाकरे बालिश आहे. कधी पण कोणाला भेटायला जाईल. अशी बोचरी टीका राणे यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, सावरकरांचे देशासाठी योगदान त्याला माहिती नाही. बाळासाहेब सावरकरांना का मानत होते त्याला आणि त्याचे वडिल उद्धव ठाकरेंना सुद्धा माहिती नाही. राहुल गांधींच्या यात्रेत ते गेले त्यांना वाटलं फोटो येतील त्यासाठी ते गेले. असा टोला देखील राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे.