मुंबई : एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झाले नाहीत. आमच्यासारखे शिलेदार ताठ मानेने त्यांच्या मागे उभे राहिले. म्हणून शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले, असे मोठे विधान भरत गोगावले यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात नाराजींच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. यावरुन विरोधकांनी शिंदेंना घेरले आहे. या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उरलेल्या भाकरीत देखील आम्ही वाटा द्यायला तयार आहोत, असे सूचक विधान गोगावलेंनी केले आहे.
भरत गोगावले म्हणाले की, आमच्यामध्ये नाराजी अजिबात नाहीये. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समज दिली असून उरलेल्या भाकरीत देखील आम्ही वाटा द्यायला तयार आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
तर, संजय राऊतांच्या टीकेवरही भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमचे सरकार वेडे आहे. काम करण्याचे वेडं आमच्या सरकारला आहे. हे घरी बसणारे सरकार नाही. आता विरोधकांना वेड लागण्याची पाळी आलीये, असा टोला त्यांनी लगावला आहे. सो सुनार की एक लोहार की आम्ही आमच्या कामातून उत्तर देवू, असेही गोगवलेंनी म्हंटले आहे. तसेच, कर्नाटक सरकारने शिवरायांचा पुतळा हटवला असेल तर ते फार दुर्दैवी आहे. याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन मनसे आक्रमक झाली असून राजापूरमधील टोलनाका फोडला आहे. यावर बोलताना गोगावले म्हणाले की, स्वतः दोन वेळा बांधकाम मंत्र्यांनी १५ दिवसात रस्त्याची पाहणी केलीये. गणपती उत्सवाच्या आधी एक लेन सिमेंट रस्त्याची सुरु केली जाईल. गणेशभक्तांना चांगला रस्ता देण्याची आमची मानसिकता आहे. ७४० कोटी रुपये केंद्राने देखील दिलेत, असे त्यांनी सांगितले.