गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे. रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांसासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली गेली. यामध्ये १६४ मतांसह भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी निवडले गेले. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राजकीय नाट्यावर विधानसभेतून निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात पेरणीची अवस्था काय? पाऊस नाही, पेरण्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कर्जाची व्यवस्था नाही या सगळ्या सत्तेच्या खेळात सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे तुमचं दुर्लक्ष झाले असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षातच बसायचंय हे गृहित धरुन आम्ही चाललो होतो. पण अचानक महाविकास आघाडी तयार झाली. यानंतर मिळालेल्या संधीत अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काम केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. कोरोनात आर्थिक अडचणी झाल्या. या अडचणी आता तुम्ही सोडवा. प्रत्येक गोष्टीची इतिहासात नोंद होत असते. तुम्ही जे केलं त्यावरही पुस्तक लिहिलं जाईल. सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, काय करायचं ते केलं, पण बंदुक आमच्या खांद्यावर ठेवली, आम्ही कोणतीही चूक केली नाही.