मुंबई : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. यावर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ही दादागिरी तात्काळ थांबवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरीस्थळी स्थानिक नागरिक, महिला, मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
तर, सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतकऱ्यांचे बळी घ्यायचे आहेत का, असा प्रश्नही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.
दरम्यान, कोकणातल्या रिफायनरीबाबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारला केवळ इतकंच सांगायचं आहे लोकांच्या जीवाशी खेळून, लोकांना गप्प करून सत्यापासून दूर जाऊन पक्ष वाढवणार असाल तर असा पक्ष कोकणात वाढणार नाही. शिवसेनेची भूमिका ठाम आहे जे जनतेला हवा आहे तेच शिवसेना करते, असे त्यांनी सांगितले.