मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख अमित ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन ठाकरे एकत्र येण्याबाबत राज ठाकरे स्वतःच बोलतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेची आज कोअर कमिटीची बैठकी झाली. यामध्ये राज ठाकरेंनीही हजेरी लावली होती.
बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरे आजारपणानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावली. तर २३ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा पदाधिकारी मेळावा होणार आहे. ही पक्षाची महत्वाची बैठक होती. उद्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत. राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार असून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून बघा, अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार नेते आधी राज्याचा दौरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे स्वतः महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्ष संघटना, आगामी निवडणुका यावर आज चर्चा झाली. उद्या सविस्तर भूमिका मांडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दोन ठाकरे एकत्र येण्याबाबत विचारले असता बाळा नांदगावकर यांनी त्यासंदर्भात राज ठाकरे स्वतःच बोलतील. यावर भाष्य करणं उचित नाही, हा प्रयोग मी आधी करून झालो आहे, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकाराचा वॉर्ड पुर्नरचनेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावर बोलताना निवडणुकीचा निर्णय अजूनही तळ्यात-मळ्यात आहे. 236 वॉर्डला कोर्टाने मान्यता दिली होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.