मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी तीनही आरोपींना आज पिंपरी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 15,000 रुपये जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली होती. यांच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करत घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी तात्काळ तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच, त्यांच्यावर थेट कलम 307 म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्नाखाली गुन्हा नोंदवला. याचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात आला असून शिंदे-फडणवीस सरकारला रोषाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी 307 चा गुन्हा रद्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यानंतर आज चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांना जामीन मिळाला आहे.
जामीन मिळाल्यानंतर मनोज गरबडेंनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरा स्मारकात मोठ्या प्रमाणात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते देखील हजर होते.
दरम्यान, पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या होत्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.