मुंबई : विधानसभेत आज भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार बच्चू कडू यांनी अजब उपाय राज्य सरकारला दिला आहे. भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावं, असा सल्ला कडूंनी दिला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सभागृहात मांडला होता. यावर बच्चू कडू म्हणाले की, भटक्या कुत्र्यांवर सोप्पा उपाय आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना तेथे कुत्रे विकले जातात. आम्हालाही गुवाहाटीला गेल्यावर कळाले. आपल्याकडे बोकडाचे मांस खाल्ले जाते. तसे, तिकडे कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. यामुळे आसाममधील व्यापाऱ्यांना बोलवले की यावर एका दिवसांत तोडगा निघेल. यासाठी आसाम सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सभागृहात एका प्रश्नादरम्यान नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. 2019 पासून सकाळी 9 वाजता एका भटक्या कुत्र्याचा त्रास पूर्ण महाराष्ट्राला होत आहे. तर यावर राज्य शासन म्हणून नसबंदी किंवा कुठला उपचार करणार आहात का? असा मिश्किल सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला होता.