शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. उस्मानाबाद न्यायालयाकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात बच्चू कडू यांना एकूण 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्यासोबत अन्य तिघांना देखील न्यायालयाने दंड ठोठवला आहे. तसेच यापुढे जर सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्यात येईल अशी तंबी देखील न्यायालयाने बच्चू कडू यांना दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बच्चू कडू यांच्याकडून उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना दरम्यान मोठा राडा निर्माण झाला होता. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 14 जानेवारी 2019 पासून प्रकरण प्रलंबित होते. इतक्या दिवस प्रलंबित असल्यामुळे न्यायालयाने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात बच्चू कडू यांना पाच हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे.