सुरज दहाट | अमरावती : सर्वोच्च न्यायालयाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध असल्याचे यावेळी न्यायालयाने सांगितले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. बच्चू कडू यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तर, शेतकऱ्यांना सल्लाही दिला आहे.
बैलगाडा शर्यतीच्या निकालावर बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या आभार मानले असून मी सुद्धा पट हाकलणाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता शेतकरी आहे. मला सुद्धा आवड आहे. मी सुद्धा पटात गेल्यावर बैल जोडी हाकलतो. मात्र, एक बंधन सर्व शेतकऱ्यांनी पाळले पाहिजे, त्या बैलाला कोंबे टोचून न पळवता थाप मारून पळवा जेणेकरून बैलाला इजा होणार नाही, असा सल्ला बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. हे तसेच कायद्यात केलेले बदल हे समाधानकारक आहेत. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी नाही, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.