बुलढाणा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. तर अनेक आमदार-खासदार व मंत्र्यांना टार्गेट करून त्यांच्या घरांची जाळपोळ होत आहे. अशातच, आज बुलढाणाच्या सिंदेखेड राजा येथे बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी रक्तदान करत मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
छत्रपतींनी घर वसवली आहेत जाळली नाहीत. ती आपली संस्कृती नाही. त्यामुळे हे जे कोणी करत असेल ते पूर्ण चुकीच आहे, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. तर, मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांना बोलावलं नाही. यावर या बैठकीसाठी कुणालाही बोलावण्याची गरज नाही स्वतःहून यायला पाहिजे, समाजातही चांगला संदेश दिला गेला असता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय आमदारांची आज बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र, सर्वपक्षीय नेते आतून एकच, मराठ्यांना वेड्यात काढतात. सर्वच पक्षांनी फसवणूक केल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे.