नाशिक : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्याने बबनराव घोलप नाराज होते. तसेच, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर शिर्डीची उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता होती.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव ठाकरे यांनी सूचनाही दिल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले आहेत.
अशातच, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्याने घोलप नाराज झाले होते. वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध करत बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याचीही माहिती मिळत होती. अशातच, आज बबनराव घोलप यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.