मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे. अशातच, शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिर्डीची उमेदवारी भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळण्याची शक्यता आहे. याचवरुन आता ठाकरे गटात चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव ठाकरे यांनी सूचनाही दिल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ झाले आहेत. या उमेदवारीला विरोध करत बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून 2009 साली शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतरच्या 2014 साली उमेदवारी जाहीर होऊनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.