मुंबई : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. आता तर त्यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीमध्ये 17 पैकी 17 जागा निवडून नाही आणल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आव्हान दिल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
परंतु, कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 17 पैकी महाविकास आघाडीला 12 जागा तर भाजपा शिवसेनेला केवळ 5 जागा मिळाले आहेत. आता आमदार शब्द पाळणार का? व मुच्छ काढणार का? असा सवाल आता ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील यांनी उपस्थित केला जात आहे.
अयोध्या पौळ पाटील यांनी संतोष बांगर यांना त्यांच्या आव्हानाची आठवण करुन दिली आहे. प्रिय लाडक्या संतोष दादुड्या "मुछ" कधी काढतोय मग, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे. कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो माझ्या गाडीला टच करून दाखवा, त्यावरही काही करत नाही. दोन दिवसांपूर्वी तो म्हणाला की १७ पैकी १७ जागांचं पॅनल निवडून नाही आणलं, तर मी माझी मिशी काढतो. संतोष दादुड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ, अस अयोध्या पौळ पाटील यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संतोष बांगर यांनी हिंगोलीत शिंदे गटाच्या बैठकीत गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढा, असे आपल्या कार्यकर्त्यांना म्हंटले होते. आम्ही भिणारे शिवसैनिक नाही आहोत आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्हाला कोणी आरे म्हटलं तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असा इशारा त्यांनी दिला होता.