शिवसेना ठाकरे गटाची सध्या शिवसंवाद यात्रा सुरू आहे. ठाकरे गट नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात सध्या ही यात्रा राज्यभराचा दौऱ्यावर आहे. त्यातच ही यात्रा काल औरंगाबादमध्ये होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या या यात्रेत गोंधळ झाल्याची घटना समोर आली. या गोंधळावरून आता राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला आहे. वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनीच दगडफेक करायला लावली असा आरोप देखील खैरे-दानवे यांच्याकडून केला गेला. यावरूनच राजकारण पेटलेले असताना आता या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी वेगळाच दावा केला आहे. महालगाव येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेदरम्यान, गोंधळ झाला, परंतु ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली नसल्याचा दावा ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची सभा महालगाव येथे झाली. सभा संपल्यावर त्यांचा ताफा निघाला असताना काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यात एक माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला आहे. परंतु जसा दावा करण्यात आला आहे की, दगडफेक करण्यात आली आहे, तसे काहीही झालेलं नाही. तसेच सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याची कोणतेही घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, सभेदरम्यान एक दगड फेकल्याचा आरोपात देखील काहीही तथ्य नाही. कारण असे झाले असते तर सभेत गोंधळ उडाला असता. मात्र सभा सुरळीत झाली असून, आदित्य ठाकरे यांचे देखील पूर्ण भाषण झाल्यावर सभा संपली. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही. तसेच पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी जो केला आहे, त्याचीही आम्ही चौकशी करू. असे देखील पोलीस उपअधीक्षक लांजेवार यांनी यावेळी सांगितले.