औरंगाबाद येथे आज रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते रेल्वे पीटलाइन व रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणातून रखडलेल्या रेल्वे विकासावर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अच्छे दिनची आठवणही रेल्वे मंत्र्यांना करून दिली.
काय म्हणाले जलील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षापुर्वी अच्छे दिनची घोषणा केली होती. ते अच्छे दिन तुमच्या येण्यामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्यातील रेल्वे येतील, अशी अपेक्षा आहे. पण `बहोत देर कर दी हुजूर आते आते`, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना यावेळी लगावला आहे.
भाषणात जलील म्हणाले की, मराठवाड्याचा रेल्वे विकास गेल्या कित्येक वर्षापासून ठप्प आहे, साध्या गोष्टीसाठी भांडावं लागत. जोपर्यंत तुम्ही मराठवाडा रेल्वेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित महसूल मिळणार नाही.रेल्वेचे मजबुत नेटवर्क नसल्याने मराठवाड्याचा विकास झालेला नाही. या भागात अजिंठा-वेरुळ सारख्या जगप्रसिध्द लेण्या आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक इथे येत असतात. पण इथून देशाच्या इतर पर्यटन क्षेत्राला जोडणारे रेल्वेचे जाळे नसल्यामुळे अडचणी येतात.
रेल्वे सोबतच या भागात आयटी क्षेत्राचा विकास झाला तर आम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार आहे.आम्ही विकासकामासाठी राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी उभे राहू. परंतु आम्हाला रेट आॅफ रिटर्न मिळत नाही, असे सांगितले जाते. मागास क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय ते होणार नाही. आता इथे रेल्वे विकास करा, फायदा-तोटा विसरून मदत करा, अशी मागणी देखील इम्तियाज यांनी यावेळी केली.