निस्सार शेख | चिपळूण : शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांच्या पाग येथील घरावर मंगळवारी रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप, पेट्रोलच्या बॉटल्स व दगड आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
भास्कर जाधव यांनी मंगळवारी कुडाळ येथे सभा घेतली होती. व संध्याकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञाताकडून जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पाग नाक्यावरील घराच्या बाहेर रात्री दगड व हॉकी स्टिक आणि पेट्रोलच्या बॉटल्स दिसून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करण्याच्या प्रयत्न केला असावा, असा अंदाज शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असून जाधव यांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राणे विरुद्ध जाधव असा असा संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुख व मातोश्री यांच्यावर जहरी शब्दांत टीका करून शिवसेनेला मत देऊ नका, असे सांगणारे आमदार भास्कर जाधव हे मातोश्रीवर भांडी घासतायत, अशा शब्दांत माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपच्या चिपळूण शहर कार्यकर्ता संवाद मेळाव्यात टीका केली होती. त्यांच्या टीकेला भास्कर जाधव यांनी काल कुडाळ येथील सभेत जोरदार प्रत्युत्तर देत राणे पिता-पुत्रांवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञाताकडून आमदार जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना ऊत आला आहे. तसेच, पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये राडा होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.