आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.आज आणि उद्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे.ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी बैठकीवर जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे.
ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला... ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.
महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे...फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना...महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे! असे म्हणत शेलारांनी टीका केली आहे.