मुंबई : नीती आयोगावरुन राजकारण आता तापत आहे. नीती आयोगावरुन विरोधकांनी टीका केल्यानंतर आशिष शेलारांनी थेट आव्हान दिले आहे. विरोधकांना सांगतो याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीत आमच्या समोर या नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला.
आशिष शेलार म्हणाले की, जयंत पाटील यांचा मुंबईशी संबंध काय? मुंबईकरांशी लेन देन काय? जयंत पाटील यांचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांचे भाषण असत्य आहे. ज्या १०६ हुतात्म्यावर गोळीबार केले त्या काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने केले, त्या १०६ हुतात्म्यांच्या रक्ताचे हात काँग्रेसचे आहेत आता उद्धवजींच्या पक्षाला ते लागले आहेत, राष्ट्रवादी तेव्हा नव्हतीच. १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडण्याचे काम आणि पाप हे काँग्रेस आणि उद्धवजींच्या शिवसेनेचे आहे. नीती आयोगाबाबत प्रश्न विचारणार असतील तर आमचं त्यांना स्पष्ट उत्तर आहे. मूर्खांच्या नंदनवनात उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
जर नीती आयोगाने चार अन्य शहरे निवडली असती तर कोल्हेकुई करणारे तर मुंबईला का नाही निवडलं मुंबईच्या बाबतीत तकलादू भूमिका, विरोधी भूमिका म्हणून कोल्हेकुई केली असती. त्यांना आज बोलायला जागा नाही म्हणून खोटे बोलत आहेत. पहिल्या चार शहरात मुंबई आहे. त्यातही ज्यांचा संजय राऊत झालाय त्या संपादकांनी त्याचा अभ्यास करावा. हा पूर्ण ग्रुप म्हणून एमएमआरचा विषय आहे. आणि एमएमआर म्हणजे केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर त्यात नऊ अन्य महानगरपालिका आहेत. नऊ महानगरपालिका देशापासून वेगळी करणार असं मुर्खांसारख्या विधान करणाऱ्यांना बेअक्कल म्हणावे नाहीतर काय म्हणावे?
यांच्या आरोपाना घेऊन वादविवाद करायचा असेल तर उल्हासनगर देशापासून वेगळे होणार आहे का? ठाणे वेगळे होणार आहे का? मीरा-भाईंदर देशापासून वेगळा होणार आहे का? हा तोडण्याचा डाव आहे ही मूर्खांच्या नंदनवनात जगणारी लोक आहेत, अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठणकावले आहे.