Arvind Sawant : राज्यात शिंदे गटाने बंड केल्यापासून राजकीय घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. त्यामुळे रोज अनेक घटनांचा घटनाक्रम राज्याच्या इतिहासात जमा होताना दिसत आहे. यात कळीचा मुद्दा म्हणजे बाळासाहेब असते तर त्यांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असती का? असा सवाल भाजपा नेते आणि शिंदे समर्थक करत आहेत. त्यातच आता अरविंद सावंत यांनीही शिंदे गटाला इशारा देणं सुरूच ठेवलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाभारताचा दाखला देत शिंदे गटाबाबत सूचक विधान केलं आहे. (arvind sawant warn eknath shinde)
अरविंद सावंत हे सध्या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीतून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, ती शिवसेना आता हलली आहे. शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो आणि पुढेही कायम राहणार असे स्पष्ट वक्तव्यं अरविंद सावंत यांनी केलं आहे. तसेच देशात सगळीकडे खोटारडेपणा चालला आहे. त्यामुळे मंथनाची गरज आहे, सत्य कधी हरत नाही, सत्याला परीक्षा मात्र द्यावी लागते. रामायण महाभारतात ही परीक्षा द्यावी लागली. पण कौरवांपुढे विजय हा पांडवांचाच झाला. हा इतिहास आहे, असा थेट इशारा सावंत यांनी शिंदे यांना दिला आहे.
दरम्यान, खाऊन ज्यांना अपचन झाले ते लोक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे गटानं केलेलं बंड नाही तर ही गद्दारी असल्याचा निशाणा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. आपल्याला राजकारण जमलं नाही हेच चुकलं असल्याचे ते म्हणाले. जिथे गेलात तिथे आनंदात राहा. तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं.