मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं सांगितलं आहे. यावरुन शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ही सर्व नाटक आहेत. बगल देण्यामध्ये भाजप मास्टर असल्याची टीका त्यांनी केली आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, राज्यातील जनतेला माहित आहे की मुंबई मिळाली. पण, बेळगाव मराठी भाषिक असताना समावले नाही. कर्नाटक सरकारने खूप जास्त जुलम केले आहेत. मराठी शाळा बंद पडल्या. याविरोधात तरुण पिढी आंदोलनात उतरली आहे. पहिल्यांदा न्यायालयाने कर्नाटक सरकारला बजावले. मात्र, त्यांनी मुद्दा मांडल्याबरोबर बोम्मई यांनी वेगळा विषय काढला.
शिंदे-फडणवीस सरकारला काल-परवा जाग आली. महाराष्ट्राकडून दिरंगाई होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सीमा प्रश्नावर काम केलं. मी लोकसभेत हा मुद्दा सभेत मांडायला सुरुवात केली की भाजपचे खासदार उभे राहतात. हे सगळं त्यांची नाटक आहेत. बगल देण्यामध्ये भाजप मास्टर आहे, असा निशाणाही अरविंद सावंत यांनी भाजपवर साधला आहे. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबेनेवर बोलत नाहीत. त्यांना महाराष्ट्राबदल कधीच आत्मीयता नव्हती, असेही त्यांनी म्हंटले आहे.
शंभूराजे देसाईंना कसलं प्रेशर आहे. उद्धव ठाकरे यांनी हा विषय काढला आणि त्यानंतर या सरकारने बैठका घेतल्या. मराठी माणसाची संख्या कशी कमी करायची हे भाजपची रणनीती आहे, अशी टीका सावंतांनी केली आहे. जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेलच, असेही त्यांनी म्हंटले आहे.