मुंबई : राज्यात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना अमरावतीमधील भाजप समर्थित आमदार रवी राणा आणि शिंदे गट समर्थित आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद टोकला गेला आहे. बच्चू कडू यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात रवी राणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी मध्यस्थी केली आहे.
बच्चू कडू रवी राणा यांच्यावर किराणा वाटपावरुन टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोक्यांचे गंभीर आरोप केले. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच संतापले असून थेट पोलीस स्टेशनमध्येच तक्रार दाखल केली. यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे-भाजपात आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशात बच्चू कडू व रवी राणांमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यांनी मध्यस्थी केली आहे.
रवी राणा व बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीसांनी फोन करुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, दिवाळी झाल्यावर लवकरच बच्चू कडू, रवी राणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याचेही समजत आहे. यामुळे रवी राणा व बच्चू कडू यांच्यात दिलजमाई होणार का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
काय आहे वाद?
खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत.तसेच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? इथून खिसे कापायचे, गोरगरिबांच्या खिशात हात घालायच, लोकशाहीचे पतन करायचं व राजकारणाची ऐसी की तैशी करायची, अशी टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता केली होती. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू ही नौटंकी छाप असून ते फर्स्ट्रेशनमध्ये गेले आहेत. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला. गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला होता. यावर बच्चू कडू संतापले असून आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्हाला राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असे आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले होते. तसेच, माझ्यावरील आरोप राणा यांनी सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल. नाही तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, असेही बच्चू कडू यांनी म्हंटले होते.