मुंबई : राज्यसभेच्या एका जागेसाठी कॉंग्रेसचे उमेदवार (Congress) इमरान प्रतापगडी (Imran Pratapgarhi) यांनी आज अर्ज दाखल केला आहे. परंतु, या उमेदवारीवर कॉंग्रेसमधील अनेक नेते नाराज होते. परंतु, हायकमांडचा निर्णय अंतिम असेल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी यांनी अर्ज भरला आहे. परंतु, या निणर्यावर राज्यातील कॉंग्रेस जनांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक जण इच्छुक असतानाही बाहेरील नेत्याला संधी दिल्याने कॉंग्रेस नेते नाराज झाले असल्याचे समजते आहे. तर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील नाराजी हाय कमांडसमोर मांडणार असल्याचे सांगितले होते.
हाय कमांडशी चर्चा झाल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, हायकमांडचा निर्णय हा अंतिम आहे. लोकसभा आणि राज्यसभा या देशाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने युपीत बाहेरून सदस्य आणले. तेव्हा चर्चा झाली नाही. मग आताच का, असा सवालदेखील त्यांनी विचारला. केवळ काँग्रेसची चूक मिळत नाही म्हणून काहीही मुद्दे उखरुन त्यावर टीका करण्यात येत आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे.
काँग्रेस उमेदवाराने अर्ज भरताना मराठीत शपथ घेतली आहे. यामधूनच कॉंग्रेसचे सार्वभौमत्व दिसते. तसेच, व्यक्तिगत नाराजी मांडण्याचा अधिकार व हक्क काँग्रेसमध्येच दिसतो. तो कधी भाजपामध्ये दिसत नाही, अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे.
तर, इम्रान प्रतापगडी म्हणाले की, काँग्रेस लोकतांत्रिक परिवार आहे. यामुळे कोणताही अंतर्गत विरोध नाही. तर, सोशल मीडियावर विरोध निर्माण केला जात आहे. काहींनी वैयक्तिक नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, लोकशाहीत व काँग्रेसमध्ये हा अधिकार मिळतो, असे त्यांनी सांगितले.