राजकारण

'शिवरायांचा जन्म कोकणात' विधानावरुन वाद पेटला! प्रसाद लाड यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त

वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी प्रसाद लाड यांचा निषेध केला आहे. वाढता विरोध पाहता लाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा वाद अद्यापही शमला नसून त्यात आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने लाड यांचा व्हिडीओ शेअर करत जोरदार टीका केली होती. यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींनी लाड यांचा निषेध केला. वाढता विरोध पाहता प्रसाद लाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रसाद लाड म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या नावाने राष्ट्रवादी जे राजकारण करत आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. काल ज्या भावनेतून मी वक्तव्य केलं, तिथे मी चूकही सुधारली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी व स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली, असे मी स्पष्ट केलं होतं. छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला, हे सुद्धा त्यावेळीच सांगितलं. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी सातत्याने करत आहे. राष्ट्रवादीचा मी निषेध व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती केली. आणि संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.

यावर प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

तर, अमोल कोल्हे यांनीही प्रसाद लाड यांच्यावर टीका केली होती. काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा, असे टीकास्त्र अमोल कोल्हेंनी डागले होते.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती