पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित दादा आणि चंद्रकांत दादा यांना एकदा विनंती आहे की एकदा याचे प्रेझेंटेशन पहावे. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. देशातून मला डिझेल आणि पेट्रोल हद्दपार करायचं आहे.
तसेच पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. मला भारतातुन पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचेय. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. पुण्याला पेट्रोल- डिझेल पासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.