मंगेश जोशी | जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेने (Shivsena) सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवेसेनेतील गळती थांबवण्यासाठी आता हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंवर (uddhav Thackeray) असलेली शिवसैनिकांची निष्ठा थेट कागदावर लिहून घेतली जात आहे. जळगावात शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र भरुन घेतले जात आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू नये म्हणून जळगावात शिवसेनेकडून मोठी काळजी घेतली जात आहे.
उध्दव ठाकरे यांच्यावर निष्ठा असल्याबाबत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तसेच निष्ठापत्र प्रत्येक शिवसैनिकांकडून भरुन घेतलं जात आहे. आतापर्यंत महापालिकेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी व शिवसैनिक अशा तीनशेपेक्षा जास्त जणांनी हे निष्ठापत्र भरुन दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवेसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी, खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडत आहे. हे आउटगोईंग थांबवण्यासाठी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. विविध सभांद्वारे दोघेही शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. आता प्रतिज्ञापत्रद्वारे आणखी एक नवी मोहिम सुरु करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.