मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यावरुन राज्यात मोठे वादंग उभे राहिले आहे. विरोधकांकडून कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज्यपालांची पाठराखण केली आहे. मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जातो, असे त्यांनी म्हंटले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात. त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. परंतु, त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हंटले आहे.
तर, श्रध्दा वालकर हत्याकांडप्रकरणवरही अमृता फडणवीसांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाबाबत जे झाले त्याचे दुःख होत आहे. खोलात जाऊन तिला न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय मिळाला पाहिजे की सगळे हादरले पाहिजेत. स्त्रीयांवर हात उचलायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. भारताला पुढे न्यायचे आहे. तर स्त्रीयांच्या सहकार्याची गरज आहे. स्त्रीयांनी सशक्त राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.