कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास समोर आला आहे. या निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसने तब्बल 136 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केला आहे. त्यातच दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. या ठिकाणी भाजपच्या अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. परंतु, तरीही भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. याच निवडणुकीवर आता यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “कर्नाटकसारखं राज्य संधी देत आहे. काल आम्ही कर्नाटकमध्ये सत्तेत होतो, आज काँग्रेस आहे आणि उद्या आणखी कोणी असेल. ते कर्नाटक राज्यासाठी चांगलंच आहे. त्याची काही अडचण नाही.” असे त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, “लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्र निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील याचा सर्वांना विश्वास आहे,” असं मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं.