बारामती : अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलं आहे. यावरुन अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवारांवर टीका केली होती. याला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
लालबागच्या चरणी असलेली दानपेटी उघडली गेली. त्यावेळी एका भक्ताने चिठ्ठी टाकली असावी आणि त्याची ती इच्छा पूर्ण होवो, असे अमोल मिटकरींनी म्हंटले आहे. ते पुढे म्हणाले, त्यांनी ट्विट का केलं? आणि मग ते डिलीट का केलं ? १४५ चा आकडा असल्याशिवाय मुख्यमंत्री पद मिळत नाही. 45, 55, 105 असं संख्याबळ असलं तरी मुख्यमंत्री पद मिळत नाही, असा टोला त्यांनी कंबोज यांना लगावला आहे. भावनेच्या भरात त्यांनी ट्विट केलं असावं आणि नंतर डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, असाही निशाणा मिटकरींनी साधला आहे.
१४५ चा आकडा असल्याशिवाय कोणीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. मग ते फडणवीस असो किंवा शिंदे किंवा अजित दादा असो. तुम्ही पण अजिबात घाई करू नका. 2024 च्या निवडणुकीत दादा जास्तीत जास्त जागा निवडून आणून मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अनेक आमदार आणि खासदार आहेत मात्र हा आकडा गुलदस्त्यात आहेत. नागालँडच्या आमदारांनी देखील दादांना पाठिंबा दिला. सर्वांना दादांच नेतृत्व सर्वांना मान्य आहे. दादांचं नेतृत्व सर्वजण स्वीकारत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. अनेक आमदार संपर्कात आहेत आणि अनेक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत येणाऱ्या काळात लवकरच सगळं चित्र स्पष्ट होईल, असेही अमोल मिटकरींनी सांगितले आहे.