मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत आहेत. तर, दुसरीकडे राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीले आहे. मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी मिटकरींनी पत्रात केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी संविधानिक गांधी मार्गाने जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. आज सहावा दिवस आहे. त्यांनी प्राण पणाला लावले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सरकारने मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर जस्टीस शिंदे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेमध्ये "कुणबी' अशी नोंद असलेल्या लोकांना प्रथम टप्प्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने सकारात्मक पावले उचलत आहे, याचे समाधान आहे.
मात्र मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे त्याला वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी चर्चा घडवून आणण्याकरिता अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, संघर्षयोध्दा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या पुढील दिशा मजबूत करण्यासाठी समाजाला त्यांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी तुर्तास उपोषण मागे घेऊन हा लढा सुरुच ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही ते म्हणाले आहेत. मराठा समाजाला नव्याने आरक्षण द्यायचं नसून छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुर्नःप्रस्थापित करायचे आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून जन्मलेलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येणार नाही. याकरिता सरकारने वेळ काढू नये, तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे, असे मिटकरींनी म्हंटले आहे.