मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडले. याप्रकरणी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांची अटक व सुटकाही करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा आव्हाड अडचणीत आले असून त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादीकडून याचा निषेध करण्यात येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात येत आहेत. तर, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चुकीचा इतिहास दाखविणाऱ्या विरुद्ध आवाज उठवला तर 354 सारखा खोटा गुन्हा सुद्धा या राज्यात दाखल होऊ शकतो याचे उदाहरण आव्हाडांच्या निमित्ताने पाहायला मिळाले. खुन्नस किती असावी? किती खालची पातळी गाठावी ?हे यानिमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, विनयभंगाच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी अत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.