अभिराज उबाले | पंढरपूर : राज्यात सध्या वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, भाजप नेते प्रसाद लाड यांच्यानंतर आणखी एका नेत्यांची यात भर पडली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या विधानाचा आता विरोधकांकडून निषेध करण्यात येत असून राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील मंत्रीपद मागण्यासाठी भिकारचोट झाले होते, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल चढविला आहे. ते म्हणाले की, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या डोक्यातील घाण साफ करण्यासाठी संत गाडगेबाबा यांचा झाडू घ्यावा लागेल. सतत भाजप नेत्याकडून महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या ज्या लोकांनी काही कर्तृत्व केले नाही. अशांचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आता रस्त्यावर उतरून भाजपच्या वाचाळविरांना विरोध करण्याची वेळ आली आहे, असा इशाराही आमदार मिटकरींनी दिला आहे.
काय म्हणाले नेमके चंद्रकांत पाटील?
त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे, मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.