मुंबई : महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. तर, याचवेळी भाजपकडून माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. प्राण्यांना मोर्चात नेता येणार नाही अशी अट महाराष्ट्र पोलिसांनी आम्हाला घातल्याने आम्हीं प्राण्यांना दुसरा मोर्चा काढायला सांगितला आहे, असे म्हणत अमोल मिटकरींनी भाजपच्या मोर्चाची खिल्ली उडवली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडीचा मोर्चा कशाप्रकारे अयशस्वी होईल यासाठी भाजपकडून एक छोटासा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महापुरुषांचा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आहे, असं आशिष शेलार म्हणतात. कारण काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशमध्ये झाला असं संजय राऊत म्हणाले. माझे या सर्वांना यामध्ये चित्रा वाघ, आशिष शेलार चंद्रकांत पाटील प्रवीण दरेकर यांनी आपल्या घरातील भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा ज्योतिबा फुले यांचा आपल्या घरातील भिंतीवरील फोटो शेअर करावा मी यांना एक लाख रुपये बक्षीस देईल, असे आव्हानच त्यांनी भाजप नेत्यांना केले आहे. तसेच, यांचं म्हणजे पोटात गोळवलकर आणि ओठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचं चित्र आहे, असा निशाणाही मिटकरींनी साधला आहे.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतांनी डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा चुकीचा उल्लेख केल्याविरोधात भाजपचे आज मुंबईत माफी मागो आंदोलन करण्यात येणार आहे. मविआच्या नेत्यांविरोधात भाजप आंदोलन करणार आहे. प्रसाद लाड, तमिल सेल्वन यांच्या उपस्थितीत हे आंदोलन आंदोलन करण्यात येईल. हिंदू देव-देवता, संत-महंतांबद्दल सतत व्देषपूर्ण विधाने करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, वारकरी संप्रदायाचा अपमान करत भाषणे देत राज्यभर फिरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदायाने आज ठाणे बंदची हाक दिली आहे.