Amol Kolhe : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
त्यानंतर अमोल कोल्हेंनी ट्वीट करत ते शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं. आता मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे आता त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
एका माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अमोल कोल्हे म्हणाले की, शपथविधी कार्यक्रमाला राजभवनात गेले तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. उत्तरदायित्व, विश्वासार्हता, नैतिकता या सर्व गोष्टींना तिलांजली देणार असू तर मला राजकारणातच राहायचं नाही. त्यापेक्षा मग मी खासदारकीचाच राजीनामा देईन. या राजकारणासाठी मी आलेलोच नाही. असे अमोल कोल्हे म्हणाले.