अमझद खान |कल्याण : मनसेने शिंदे - फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेदरम्यान अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना पत्रकारांनी विचारल असता, मला राज ठाकरेंच्या मंत्रीमंडळात मंत्री व्हायला आवडेल असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला.
महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी अनऔपचारिक बोलताना, त्यांनी संघटनात्मक काही बदल देखील केले जातील, या दौऱ्या दरम्यान ठिकाणच्या विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय, त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपं करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असे सांगितले.
दरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर राज्याच्या राजकारनात वेगाने घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष एकिकडे सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मनसेचे नेते अमित ठाकरे सक्रिय झाले असून महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठका संवाद सुरू केला आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी दाखल झालेत. अमित ठाकरे कल्याण मधील स्प्रिंग टाईम क्लब मध्ये विद्यार्थी , मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दुपार नंतर ठाकरे डोंबिवलीतील कार्यकर्ते पदाधिकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.