नवी दिल्ली : श्रध्दा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर पहिल्यादांच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा वालकरच्या आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, आरोपी आफताब हा ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.
श्रध्दा वालकर हिची तिच्या प्रियकर आफताबने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तो हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर अमित शहा म्हणाले, श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्याला कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा मिळेल याची खात्री दिल्ली पोलीस व फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
काय आहे नेमके श्रध्दा वालकर प्रकरण?
श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब या दोघांची एका डेटींग अॅपवर भेट झाली. मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. घरच्यांचा विरोध झुगारून दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते. हे प्रेमसंबंध जुळल्याचे तिने आपल्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी तिला विरोध केला होता. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये मध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते.
श्रद्धाच्या वडिलांनी वसई पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली. आफताब पूनावाला याला 12 नोव्हेंबर रोजी दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागातील त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धाची हत्या केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, दिल्ली पोलीस सध्या पुराव्यांचा तपास करत असून त्यांना अद्याप श्रद्धाच्या डोक्याचा तुकडा सापडलेला नाही आणि हत्यार सापडलेले नाही. यादरम्यान, आफताबला न्यायालयात हजर केले असता त्याने हत्येची कबुली दिली. जे झाले ते रागाच्या भरात झाले, असे आफताबने न्यायालयात सांगितले आहे. यानंतर न्यायालयाने आफताबला 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आफताब पूनावालाची आता नार्को टेस्ट होणार असून त्यापूर्वी पॉलीग्राफ चाचणी करावी लागणार आहे.