मुंबई : महायुतीला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अजित पवार गटाने चांगल्या खात्यांची मागणी केली. यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचे बोललं जात आहे. अशातच, आता महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील खातेवाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला असून अमित शहा मध्यस्थी करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सातत्याने बैठकांचे सत्र सुरु आहे. यामध्ये खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा होत आहे. परंतु, अजित पवार गटाने वजनदार खाती आणि पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. या मागणीला भाजपकडून हिरवा कंदील मिळाला असला तरी शिंदे गटामुळे विलंब होत असल्याचे समजत आहे. याबाबत शिंदे गटातील नेते जाहिरपणे नाराजी व्यक्त करत आहेत.
विशेषतः अजित पवारांना अर्थखाते देण्याबाबत विरोध केला जात आहे. यामुळे तीनही गटात खातेवाटपाचा तिढा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. शिवसेना आणि अजित पवार गटात अमित शाह मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन मंत्र्यांसाठी बंगल्यांचे वाटप करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांसाठी मंत्रालयात दालनही वाटण्यात आले आहेत.