राज्यात एकीकडे राजकीय वर्तुळात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी अनेक भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मनसे, भाजपच्या युतीच्या चर्चा होत असताना त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.
अंबादास दानवे हे आज गोंदियात असताना तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते राज ठाकरे यांच्यावर बोलताना म्हणाले की, राज ठाकरे हे मागच्या लोकसभेत भाजपाला लाव रे तो व्हिडीओ म्हणत होते. तीन चार महीन्यापूर्वी हेच राज ठाकरे मस्जिदीवरून भोंगे काढा असे म्हणत होते. मात्र, ते भोंगेही सुरू आहेत अन हनुमानचालीसाही एकाही भोंग्यावरून म्हटल्या गेली नाही. अशी टीका दानवेंनी भोंग्यावरून राज ठाकरेंवर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे त्यावेळेसच्या महाविकास आघाडी सरकार,शिवसेनेला विरोध करीत होते. आता भाजपा त्याच राज ठाकरेंना मित्र बनवू पाहत आहे. कारण राज ठाकरेंची भाषा आणि वर्तन आहे ते भाजपाशी मिळते- जुळते असून भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणजे राज ठाकरे असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी राज ठाकरेंवर केला.