मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. तर, या मुद्द्यावरुन अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरले आहे. अंबादास दानवे यांनी एक पेनड्रईव्हच उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिला आहे. दरम्यान, भाजपचे नेते असल्यामुळे अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, मी काल पेनड्राईव्ह दिला आहे. त्यात जे काही असेल ते सभापती तपासतील. मी सुद्धा तपासले आहे. अनेक जण मला संपर्क करत आहे. परंतु, मी कोणाला पेनड्राईव्ह दिला नाही. असे जर कोणत्या पक्षात झाले असते तर त्याला पक्षातून काढले असते. भाजपने सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली असती. पण, भाजपचे नेते असल्यामुळे अजून कारवाई झाली नाही, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
तसेच, गुन्हेगारावर धाक राहिला नाही. ठाणे, पुणे, महाराष्ट्रात अत्याचार वाढत आहेत. याला कारण कायद्याचा धाक राहिला नाही. सरकार केवळ राजकीय नेत्यावर कारवाई करण्यात व्यस्त आहे, अशी टीकाही दानवेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या पेनड्राईव्हवर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली होती. तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे माझ्यासाठी फार कठीण परीक्षा आहे. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवरांना ते बघायला सांगेन. त्या महिलेची तक्रार आली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले होते.