मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे एकच खळबळ माजलेली आहे. सोमय्या यांच्या व्हिडीओचा निषेध राज्यभरातून करण्यात येत असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याची पावसाळी अधिवेशनात दखल घेतली असून विरोधकांनी सोमय्यांना घेरलं आहे. तर, अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला आहे. आठ तासांचे व्हिडीओ मी सभापतींना देत आहे, असे म्हणत दानवेंनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. महामंडळात नियुक्त्या देतो, विधानपरिषदेवर घेतो असं सांगितलं जातं आणि एक्स्टॉर्शन केलं जातं. असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती एक्सटॉर्शन करत आहे. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो, अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे.
दरम्यान, याआधी दानवेंनी प्रतिक्रिया देताना सोमय्यांवर शरसंधान साधले होते.अनेक महिलांनी तक्रारी केल्या आहेत. माझे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ते माझ्या तालावर नाचतात असे म्हणून काही लोकांना ब्लॅकमेल केले असल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहे, असेही त्यांनी सांगितले होते.