राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, सत्तास्थापनेच्या वेळेला जे केंद्र बनले होते. त्या आसाम मधील गुवाहाटीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा भेट दिली आहे. मात्र, शिंदे गटातील ६ आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी मोठा दावा केला आहे. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असे सामंत म्हणाले होते. त्या विधानावर आता शिवसेना ठाकरे गट नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले दानवे?
उदय सामंत यांना प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले की, “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते एकसंघ आहेत, यातच सगळ्या गोष्टी आल्या. त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते एकसंघ नाहीत”, असे दानवे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “ज्याच्या त्याच्या आस्थेचा हा विषय आहे. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा, अतीवृष्टीचा प्रश्न आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी २२०० कोटींचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पडून आहे. त्यासाठी उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्र्यांना ही बैठक घेण्यासाठी वेळ नाही. पण देवदर्शनासाठी वेळ आहे. महाराष्ट्रानं हे सगळं बघावं”, असा देखील टोला दानवेंनी शिंदे गटाला लगावला आहे.