औरंगाबाद : आम्हाला घोडेबाजार करण्याची गरज नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून राज्यसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे. ते औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होते.
भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी एक अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरविला आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, सातवा उमेदवार आधी आम्ही उभा केला नाही. तर त्यांनी उभा केला. या निवडणुकीत अपक्ष आमच्या सोबत आहेत. म्हणूनच घोडेबाजार करण्याची आम्हाला गरज पडणार नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने भाजपचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत.
वडील छत्रपती शाहू राजे भोसले यांनी संभाजीराजे भोसले यांना अपक्ष उभे करण्याची खेळी भाजपचीच असल्याचा खुलासा केला होता. याविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, संभाजीराजे यांना एकदा भाजपने संधी दिली होती. राजे पहिल्यापासूनच आमच्यासोबत राहिले नाही. तर, त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणीही केली नव्हती. सुरुवातीपासून अपक्ष राहणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले होते. परंतु, शिवसेनेने पाठिंब्याचा शब्द पाळला नाही, त्यांना धोका दिला, असा आरोप त्यांनी केला आहे.
तर, सध्या महाविकास आघाडीत डावलले जात असल्याची भावना कॉंग्रेसमध्ये आहे. यामुळे अनेक आमदार महाविकास आघाडीवर नाराज आहेत. यावर बोलताना रामदास आठवलेंनी म्हंटले की, काँग्रेसने पाठिंबा काढला तर पुढील अडीच वर्ष सत्ता आम्ही बनवू. शिवसेनेला सर्वात आधी अडीच वर्षाचा आम्ही फॉर्म्युला दिला होता. परंतु, शिवसेनेने धोका दिला, अशी टीकाही त्यांनी केली.