कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून देखली प्रतिक्रिया येत आहेत. याच निवडणुकीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
कर्नाटक निवडणुकीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे.कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. असा टोला त्यांनी लगावला.
तर पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.